Sunday, January 26, 2014

काही न विसरता येणारं

नुकतीच साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकाला पुन्हा भेट दिली. सहा वर्षापूर्वी दोनदा कॅम्पसाठी इथं आलो होतो. त्यावेळच्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. स्मारकाची जागा, सभागृह, पारंब्या लटकणारं वडाच झाड, कँटिंन आणि समोरच छोटसं मैदान. सगळं काही आता नव्यासारख वाटत होतं. नवे सभागृह छान झाले आहेत. शनिवारी शरद पवारांच्या हस्ते इथल्या काही नव्या वास्तूंचा लोकार्पन सोहळा पार पडला. त्याच्या रिपोर्टिंगसाठी इथं आलो होतो. सेवा दलाचे अनेक जुने कार्यकर्ते भेटले. या जागेविषयी त्यांची असलेली प्रचंड आस्था, नव्या पिढिला घडवण्यासाठी ते करत असलेली धडपड जवळून पाहायला मिळाली. बाबा आढाव, युवराज मोहिते यांच्या भाषणातून या कार्याची तळमळ कळली. नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली वाहणारा फलक दिसला. आणि आम्ही गेल्या शिबिरात घेतलेलं अंनिसचं शिबिर आठवलं. तेव्हा फार सिरिअसली केल होतं. सातत्य ठेवता नाही आलं त्यात, याची आता खंत वाटते. अर्थात मी काही सेवा दलाचा कार्यकर्ता नाहीये. मी स्वतःला सत्यशोधक विचारांचा पुरस्कर्ता म्हणवतो. त्यामुळं इतर कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल आस्था वाटते. शेवटी काय मानवतेचे विचार सांगणारे, सुरुवातीला सगळेच आपले वाटतात. मग तिथून पुढे विचारांना फाटे फुटल्यावर आपणही फारकत घेत आपल्या रस्त्यावर येतोच.
मागच्या दोन वेळा जेव्हा मी इथं आलो होतो. त्या दोन्ही वेळेला माझ्या विचारात आणि आजच्या विचारांत फार बदल झालेला आहे. अर्थात आठवणीतून बाहेर आल्यावर हे वास्तव जाणवलं. फॉर अ चेंज करता पहिल्यावेळेला इथं आलो होतो. दुसऱ्या वेळेला कार्यकर्ता म्हणून. कार्यकर्ता? कोणत्या विचारांचा, संघटनेचा किंवा चळवळीचा, हे पक्क नव्हतं. असं आता वाटतयं. उत्साही होतो. इतरांपेक्षा काहीतरी  वेगळं करतोय, असं वाटायचं. बस्स तेवढच.
पहिल्या शिबिराला मी, निल्या (निलेश गोसावी) आणि हेम्या (हेमंत जांगली) फक्त टाईमपास म्हणून गेलो होतो. वर्ष २००६ होतं. अजित आणि प्रभाकरची मैत्री शिबिरात जमली. प्रमोद आणि चंदन शिबिराचे आयोजक होते. मी कॉलेज फक्त बारावीपर्यंतच केलं होतं. त्यातही एक वर्षाचा गॅप. शाळेतही कधी सहलीला गेलो नव्हतो. राहते शिबिर माझ्यासाठी नवीन होतं. आमचा एकांकिकेचा ग्रुप असल्यामुळे आम्हाला फक्त टाईमपासच अपेक्षित होता. पण प्रमोद त्यावेळी भारावलेला कार्यकर्ता होता. त्याने शिबिरालाही थोडसं वैचारिक वळण दिलं. सुरुवातील उमजायला, पटायला जडच गेलं. पण नतंर मजा आली. नितीन आणि महेशची शाहिरी गाणी ऐकून अजून जोर आला. तीन दिवसापैकी अंनिसचं शिबिर, पथनाट्य आणि एक दिवस कसल्यातरी जड चर्चेत घालवला. येताना रेल्वेत मग मीही क्रांतिगितात कोरसला सामिल झालो. गाणी झाल्यावर प्रमोद नारे द्यायचा. आम्ही पण नारे द्यायचो. त्यातला एक नारा होता, लाल सलामचा... मला त्यावेळी त्याचा अर्थ माहित नव्हता. सगळे देतायतं आपण पण देवू. कालातंराने त्याचा अर्थ कळला. पुन्हा कधीच तो नारा दिला नाही.
या शिबिरानतंर आयुष्याला थोडी कलाटणी मिळाली. वाचायची सवय लागली. मी नास्तिक का आहे, हे भगतसिंहाच पुस्तक वाचनात आलं. डोक्याला जोरदार सणक बसली. ज्या गोष्टींच्या तळ्यात-मळ्यात राहायची सवय होती. ती आता स्पष्ट झाली होती. इथून पुढ मग वाचायचा, चर्चा करण्याचा नाद लागला. प्रोत्साहनाचं प्रोटिन द्यायला प्रमोद होताच. शिवाय आणखीही मित्र. चागंला ग्रुप जमला होता. रोज वाचन, चर्चा, गाण्यांची तालिम, पथनाट्याची तयारी, असं काही ना काही चालू असायचं. बरं वाटत होतं. असंही काजूपाड्याच्या झोपडपट्टीत त्यावेळी याच्यापेक्षा दुसरं काही चागंल करण्यासारख नव्हतं.
वर्ष २००७ ला पुन्हा शिबिर आयोजित करण्यात आलं. अर्थातच यावेळी मी कार्यकर्ता होतो. मुळात शिबिराचा उद्देशच तो होता. निल्या यावेळी शिबिराचा आयोजक झाला होता. साला आदल्या वर्षी एवढे किडे केले होते. आणि यावर्षी हा साळसुदपणे डायरेक्ट आयोजक झाला. आम्ही फार जोमाने शिबिरासाठी काम केलं. नुतन, श्रद्धा, प्रियांका यांनी मुलींना शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही मुलांना. सर्वांची मेहनत सफल झाली. साठ जणांची विक्रमी (आमच्यासाठी विक्रमीच) नोंद झाली. प्रत्यक्षात साठ पेक्षा अधिक मुलं शिबिराला आले. हे तीन दिवस माझ्यासकट शिबिरातील इतर लोकही कधीच विसरु शकत नाही. मंतरलेले दिवस होते. अंनिसच शिबिर, पथनाट्य कार्यशाळा, चर्चासत्र असा भरगच्च कार्यक्रम. आमचा नवा मित्र विजय सुतारही आला होता. त्यानेही त्याचे कल्पक खेळ घेवून चांगलाच टाईमपास केला. माझे दोन भाऊ आणि बहिन मी शिबिरासाठी घेवून आलो होतो. माझ्या विचारात जसा बदल झाला तसा त्यांच्यातही व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण ते काही झाल नाही. असो.
शिबिरात अनेक बऱ्या वाईट घटना घडल्या. काही तिथंच कळल्या. काही परत आल्यावर. पण आज मागे वळून पाहताना त्यातल्या फक्त चांगल्या गोष्टी दिसतायतं. अर्थात वाईट गोष्टी घडल्या, असं आज म्हणता येत नाही. त्यावेळी तसं वाटत होतं. आजही तेच वाटतयं? तर अजिबात नाही. कधी कधी कमी अनुभव किंवा आततायी स्वभाव काही गोष्टी करायला भाग पाडतो. फार कमी वेळात मी स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजायला लागलो होतो. त्यामुळे घटनांच विश्लेषन करण्यात कमी पडलो. माझ्यासकट इतरही. आज असं वाटतं वेगळा मार्ग काढला असता तर... पण माझ्या एकट्याच्या हातात काहीच नव्हतं.

आज स्मारकाला भेट दिल्यावर पुन्हा त्या सर्व आठवणी डोळ्या समोर तरळल्या. सहा वर्षांनी इथं आलो होतो. सहा वर्षात खूप बदल झाले. काही आजही मित्र म्हणून आहेत. काही नॉट रिचेबल. काहींना मीच टाळतोय. दरवर्षी इथचं शिबिर घ्यायचं. भरपूर कार्यकर्ते घडवायचे, असा आणाभाका त्यावेळी घेतल्या होत्या. वैचारिक गफलतीमुळे म्हणा किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे पुन्हा साने गुरूजी स्मारकाला शिबिर घेणे जमलेच नाही. प्रमोद मात्र आजही शिबिरं, कार्यशाळा घेत असतो. यापुढे जर कार्यशाळेत जाण्याचा योग आला तर नक्कीच जाईल.