Tuesday, April 8, 2014

दिल देखो, कपडा मत देखो...!

मुंबई आणि मुंबईची लोकल. त्यात रोज प्रवास करणारे लाखो प्रवासी. ट्रेन लेट झाली, अपघात झाला, बसायला जागा नाही, कुणाच भांडण तर कुणाचा मोबाईल किंवा पाकीट मारलं... अशा घटना तर रोज होत असतातच. याच्या व्यतिरिक्तही घडत असतात मानवी मनाचं, स्वभावाचं प्रतिबिंब उमटवणारे हजारो प्रसंग. त्यातलाच हा एक.
....

विरारहून चर्चगेटकडे निघालेली फास्ट लोकल. सेकंड आणि फर्स्ट क्लास दोन्ही डबे खच्चून भरलेले. येणाऱ्या स्टेशनला कुणी उठतयं का? या आशाळभूत नजरेणे उभे असलेले लोक आजूबाजुला पाहत होते. दादरला काही सिट रिकाम्या झाल्या. त्या सिटवर कोण बसणार यावरुन उभे असलेल्या दोन लोकात वाद सुरु झाला. त्यातला एकाच्या हातात अंगठ्या, गळ्यात चैन, इस्त्रीचे कपडे आणि कसल्याशा डिओचा वास... असा फर्स्ट क्लासला साजेसा अवतार. दुसरा सडसडीत, मळकटलेला. चेहऱ्यावर निरागस भाव, टाइमपास चित्रपटाच्या भाषेत गलपटलेला. सेकंड क्लासला साजेसा असा माणूस.
खरतर वाद होता, मोकळ्या जागेवर कोण बसणार. पण अचानक वादाचं स्वरुप स्टँडर्डने (उच्च, निच्च... वैगरे वैगरे) घेतलं. स्वतःला फर्स्ट क्लास समजणारा व्यक्ती भलताच तापला. तुम्हीरी औकात नही है, विदाऊट तिकीट फर्स्ट क्लासमे घुसते हो... कहा कहा से आ जाते है (पुढे माता-भगिणींचा उद्धार). ‘साफ-सुफ कपडा पेहना तो. सिर्फ तुम लोक ही आ सकता है क्या फर्स्ट क्लास मे, दुसराही तोडक्या मोडक्या भाषेत उत्तर देत होता. शेवटी वाद तिकिटावर आला. एकमेकांचे तिकिट दाखवण्याची मागणी होऊ लागली. चल तिकिट दिखा... दिखा तिकिट... फर्स्ट क्लासवाल्यासोबत आता इतरही ओरडू लागले. मै क्यों दिखाऊ, तू क्या टिसी है क्या ? तर्कावर आधारीत त्याचे प्रश्न.
पाकिटमार पकडल्यावर उंदरालाही घाबरणारेजसं सामुहिक धुलाईत हात धुवून घेतात. त्या वर्गवारितले लोक आजु-बाजूला जमा व्हायला लागले. एका उत्साहिताने पुढाकार घेवून दोघांनाही तिकिट दाखवण्याची तंबी दिली. पहिला तर तयारच होता. तिकिट दाखवून मोकळा झाला. जसं काही राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं प्रमाणपत्र दाखवत होता जणू. आता दुसऱ्याची पाळी होती. बाजूलाच जाळीपलीकडे सेकंड क्लासचा डबा होता. तिथलीही मंडळी नजरे रोखून पाहायला लागली. अगर मेरे पास तिकिट होगा, तो आप मुझे क्या देंगे त्याचा बालिश प्रतिवाद सुरुच होता. हा काही दाद देईना म्हणून समोरच्याने बाह्या सरकवायला सुरुवात केली. आता राडा निश्चित. काही लोक समजवयाला लागले, असेल तिकिट तर दाखवून टाक. आपल्या कपड्यावरुन आपली लायकी काढली जावी, हे काही दुसऱ्याला सहन होत नव्हतं. न राहवून त्याने खिशातून फाटलेलं पाकिट काढलं. तीन महिन्यांचा फर्स्ट क्लासचा पास बाहेर काढला. कोर्टात बचाव पक्षाच्या वकीलाने एखादा पुरावा काढून तोडांवर मारावा या थाटात सर्वांना पास दाखवायला लागला.
सगळेच शांत झाले. न्यायनिवाडा करायला मधे पडलेला तिसरा माणूस सुमडीत निघून गेला. ज्याने वाद चालू केला तो मात्र गलीतगात्र झाला. सेकंड क्लास डब्यातली लोकं तर टाळ्या पिटायला लागली. जसं काय त्यांचाच विजय झालाय. अब उसको दो खींचके दे, सेकंड क्लासवाले ओरडायला लागले. सिर्फ कपडेसे आदमी फर्स्ट क्लास होता है क्या, तुम साले टॅक्स बुडानेवाले और अच्छा कपडा पेहननेवालेही विदाऊट घुमते हो, आता दुसऱ्याचाही  तोडांचा पट्टा चालू झाला. एका क्षणात गेम पलटला होता. क्षणापूर्वी जे लोक याला लुख्खा समजत होते, ते सर्व आता त्याच्या बाजूने बोलायला लागले. कपड्यावरुन कोणाचा स्तर ठरत नसतो. याची अचानक सगळ्यांना उपरती झाली.
आपणे आज हमे एक नई चीज सीखाई है, कपडे से आदमी की पहचान नही होती. ज्येष्ठ मंडळी बौद्धीक पाझळू लागली. दिल को देखो, कपडा मत देखो... उत्साहि तरुणही मागे नव्हते.
एकाच ट्रेनमध्ये तासाभराच्या प्रवासात कितीतरी भाव-भावनांचा रंगतदार सामना या प्रसंगामुळे पाहायला मिळाला. कपडे, देह, चेहऱ्यावरुन उच्च-नीच्च पातळी ठरवणारी प्रतिगामी भारतीय संस्कृतीची पाळमुळ आजही सुशिक्षित लोकांच्या मनात शाबूत आहेत, हे यावरुन दिसलं. तरिही खरेपणा अजून मेलेला नाही. गरीब असलो तरी कुणापेक्षा कमी नाही, हा मौलिक विचार त्या फर्स्ट क्लासमधल्या क्लासलेस माणसाकडून नक्कीच मिळाला.

Facebook Link : https://www.facebook.com/ajax/sharer/?s=99&appid=2309869772&p%5B0%5D=100001463787670&p%5B1%5D=674198872638899&profile_id=100001463787670&share_source_type=unknown