Wednesday, September 10, 2014

नव्या अॅपल फोनच्या निमित्ताने...

मोबाईलच्या दुनियेत क्रांती केली या अॅपलवाल्यांनी. टचस्क्रिन आणलं. अॅपल स्टोअर. आय पॅड, आय पॉड आणि आय फोन. मग अपडेट वर्जन्स. मग हळू हळू कळत गेलं तसं अँड्रॉइड त्याच्यापेक्षा भारी वाटू लागलं. मग पुन्हा साक्षात्कार झाला. ओएस (वापरकर्ती यंत्रणा) कोणतही असो अॅप्सच सर्वांचे बाप आहेत. ज्या ओएसमध्ये आपले लाडके अॅप्स चालतील, तोच फोन आपला. म्हणून तर मी विंडोज विकला. आता रोज नवे नवे फोन येतायत. नवे अॅप्स येतायत. वाय फायही स्टेशनवर फुकट मिळायला लागलय. मग काय घ्या नवे अॅप्स. करा अपडेट.

पण एक गोष्ट नक्की. या अॅप्सपायी माणसा माणसातले गॅप्स मात्र वाढत चाललेत. खरंच स्वानुभवावरून सांगतोय. बाजूला बसलो असलो तरी बोलण्यापेक्षा त्या चार-पाच इंचातच जीव गुंतलेला असतो. एखादा जवळचा आजारी पडला की उपचार करायला जशी धावपळ होते, नेमकी तशीच घालमेल बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर चार्जर शोधण्यासाठी करावी लागते. हल्ली तर म्हणे सार्वजनिक जागेवर चार्जिंगसाठी लावलेले मोबाईलचे चार्जर चोरीला जाऊ लागलेत. मोबाईल तो सबके पास होता है ना, पर ऐन टाईमको चार्जर किसी के भी पास नही होता... तो उठाव.

पण काहिहि असो. या अॅप्सनी रिकाम्याला जगण्याच्या नव्या लेव्हल (कँडी क्रशच्या) दिल्यायत. जे स्मार्ट नव्हते, त्यांना पाच-दहा हजारात स्मार्ट होण्याची संधी मिळाली. राजू मिस गाईड ड्रायवरला गुगल नॅविगेशनं, शेखी मिरवणाऱ्या इलिटांना ट्विटर. लोककौतुकास हपापलेल्यांना सेल्फी झळकवण्याचं फेसबुकसारखं हक्काच व्यासपीठ. शाळेतून, कॉलेजातून, जुन्या ऑफिसातून, चाळीच्या मंडळातून, ट्रेनच्या त्या ठरलेल्या डब्यातून आणि कुठून कुठून तुटलेल्या, नव्याने जोडलेल्या, जोडू पाहणाऱ्या आपल्या सर्वांना व्हॉट्सअॅपचं वरदान मिळालं. किती किती ते जोक्स. क्रिएटिव्हीटेचे आगारंच जणू. व्हेज म्हणा, नॉन व्हेज म्हणा प्रत्येकासाठी वेगळा ग्रुप. जे नव्हते कोणाच्या गिनतीच ते झाले ग्रुर अॅडमिन. काय काय कौतुक करावं तेवढ कमीच की! 
(थोडसं विषयातंर - मध्यंतरी गावाला गेलो होतो. बीडला. मनात फार कणव आणून मित्रांबरोबर दुष्काळावर चर्चा करत होतो. यंदा पाऊस नाही पडला, तर काय होईल याची. पत्रकार म्हणून म्हणालो, काही मदत लागली तर सांगा. मंत्रालयाच्या आजूबाजूलाच असतो. शेवटी आपणही काही गावचं देणं लागतो. त्यातल्या एकाने लगेचच लांबलचक मोबाईल काढला. म्हणाला, “तुम्ही वाट्सअपवर हाय का ? आपल्या सैयद बाबा दर्गा वारणीकरग्रुपवर जमा करतो तुम्हाला. सर्व खबरबात भेटत जाईल“. च्यामायला माझ्या छोट्या मोबाईलची मला त्यादिवशी जाम चीड आली.. असो)

हा तर विषय असा आहे की, खरच गॅप्स वाढलेत का? व्यक्तिनुरूप अनुभव वेगवेगळे असतीलही. पण याची झलक प्रत्येकाला एकदातरी अनुभवास आली असेलच. पूर्वी कुणाला टाळायचं असल्यास हातात वर्तमानपत्र किंवा जाडजूड पुस्तक घेवून त्यात लोक घुसून बसायचे. हल्ली एखाद्याला टाळायचं असेल, तर शंभर नंबरी उपाय एकच. पंजाएवढा मोबाईल काढा. त्याच्यावर बोट फिरवत बसा. समोरच्यालाही वाटतं. आयला मलाच का नोटीफिकेशन यायना. किबंहूना चारचौघात मोबाईलमध्ये घुसलेली व्यक्ती एकतर अॅटिट्यूड तरी दाखवतेय किंवा खरंच आपल्याला काहिच नोटीफिकेशन येत नाहीयेत. याची शंका मनात आल्यावाचून राहत नाही.

चळवळी थंड झाल्यापासून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची लईच गोची झालीय. असं वाटतं सरकारने काही अॅप्स स्वत:हून बनवले पाहिजेत. म्हणजे मेणबत्ती पंथीयासाठी. शाई फेकून तोंड काळ करणाऱ्यांसाठी. चप्पल भिरकवण्यासाठी. काळे झेंडे दाखवण्यासाठी नवे अॅप्स. म्हणजे ज्याच्यासाठी किंवा ज्याच्याविरोधात आंदोलन करायचे आहे, त्याचा फोटो सिलेक्ट करा आणि अॅक्शन. मला आठवतयं जॉर्ज बुशवर चप्पल फेकण्याचा गेम निघाला होता. हा, तसंच इंडियन वर्जन अॅप्स. म्हणजे काय पोलीस बंदोबस्त, लाठीमार, अश्रूधूर यापासून पोलिसांचा तरी जीव सुटेल.



मध्यंतरी सोशल कट्ट्यावर एक इमेज पाहिली होती. एका मैदानाच्या मध्यभागी एक लहान मुलगा पायाखाली फुटबॉल घेऊन उभा आहे. मैदानाच्या चहुबाजूंनी इतर मुलं बसली आहेत. पण खेळायला कुणीच येत नाही. सर्वांच्या हातात 'गॅझेट्स' आहेत. ते त्यातच गेम खेळत बसली होती. फार बोलका आणि जिवंत संदेश होता त्यात. आता तर मोठ्यांवरही अशा इमेजेस बनतीलच. मग त्याही याच मोबाईल अॅप्समधून वायरल होतील. आपली हळहळ, आपल्या भावना, संवेदनाही इथंच ऑनलाईन व्यक्त होतील. फॉलोअर्सच्या कमेंट्स, लाईक्सही मिळतील. काही उभे, आडवे अंगठे भेटतील. काहीजण हसऱ्या बाहुल्या पाठवतील. सगळा संवाद कसा आदिम संस्कृतीप्रमाणे. चिन्हांवर आधारीत.

No comments:

Post a Comment