Tuesday, November 18, 2014

महासत्ता आणि शौचालय

महाराष्ट्रात दशकभरापूर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू झाले. यासाठी विविध अनुदान योजना आणि स्पर्धांद्वारे खेड्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सरकारने केला. या योजनेला किती यश मिळाले, हा भाग वेगळा. पण बुलढाणा जिल्ह्यातील सुरेश बुरकुल आणि वाशिम जिल्ह्यातील संगीता ओव्हाळे यांनी मात्र स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे ज्या संत गाडगे महाराजांच्या नावाने हे अभियान चालवले जाते ते स्वतः विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आणि ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ते देखील विदर्भातील हा योगायोगच. 

बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक सुरेश बुरकुल यांच्या वडीलांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या तिसऱ्याच्या विधीदिवशी बुरकुल सर आणि त्यांच्या भावंडांनी ठरवले की वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी येणारा खर्च टाळून गावातील महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधायचे. त्यानुसार गावातील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयाच्या जागी त्यांनी नवीन शौचालय उभारण्यास सुरुवातही केली. 

खरं तर यापूर्वीही बुरकुल कुटुंबियांनी असे उपक्रम राबवले आहेत. मुळचे बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सावंगी टेकाळे या गावचे ते रहिवासी असून त्यांची नोकरी बदलीची आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांनी प्रत्येक बदलीच्या ठिकाणी स्वखर्चातून शौचालय बांधली आहेत. ज्यामध्ये सातेफळमध्ये तीन तर बुडखेडा गावात पाच शौचालये उभारली आहेत. परंतु १३ व्याच्या विधीसाठी खर्च होणाऱ्या पैशांचा असा सदुपयोग करून त्यांनी धार्मिक कार्य आणि सामाजिक काम यांची सांगड घालून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला.

बुरकुल यांच्याप्रमाणे संगिता ओव्हाळ यांचे कामही उल्लेखनीय आहे. भारतीय परंपरेत घरातील सोने विकताना दहा वेळा विचार केला जातो. त्यात विवाहीतेच्या आयुष्यात तर मंगळसूत्राला परंपरेत अनन्य साधारण महत्व आहे. अशा वेळी घरात शौचालय बांधण्याच्या आग्रहापोटी त्यांनी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवले. उघड्‌यावर शौचालयाला बसल्यामुळं आपल्याला जो मानसिक त्रास आणि कुंचबणा सहन करावी लागली, ती आपल्या मुलीच्या वाटेला येऊ नये म्हणूनच त्यांनी उचललेले हे पाऊल खरोखर उल्लेखनीय आहे.

घरातच शौचालय बांधण्यासाठी संगिता यांनी अनेक दिवस आपल्या पतीकडे तगादा लावला होता. मात्र सर्वसामान्य गरीबाच्या घरात अन्य प्रश्नांसमोर शौचालयाचा प्रश्न किरकोळ असतो. त्यामुळे त्यांना घरातून सतत नकार मिळत होता. पण संगिता आपल्या निश्चयावर ठाम होत्या त्यामुळे त्यांनी स्वतःच पैसे उभे करण्याचे ठरवले. खूप विचार केला आणि अखेर त्यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. परस्पर त्यांनी तो आमलातही आणला आणि शौचालय बांधून घेतले. त्यांचा हा निर्णय किती धाडसी असू शकतो याची कल्पना कोणतीही स्त्री निश्चित करू शकते. 

आज संगीता यांच्या या धाडसाचं कौतुक खुद्द नवनियुक्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केलं आहे. त्यांनी संगिता यांनी गहाण ठेवलेलं मंगळसूत्र मिळवून संगिताला परत केले. संगितासाठी हाच तिचा सर्वात मोठा सन्मान आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात देवालयांपेक्षा शौचालयांची जास्त गरज आहे. अशी भूमिका मांडली होती. भारत २०२० ला महासत्ता म्हणून जगासमोर येणार, असं अर्थतज्ज्ञदेखील म्हणतात. महासत्ता होण्यासाठी लागणारे लोकसंख्या, क्षेत्रफळ, नैसर्गिक साधनसंपत्ती, कुशल होत चाललेलं मनुष्यबळ, महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बहुतेक सर्व घटकही आपल्याकडे आहेतच. परंतु, शौचालयासारखी म्हटलं तर क्षुल्लक, पण महिलांच्या सन्मान अत्यंत महत्वाचा घटकाची मात्र वानवा आहे. महासत्ता होण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता राखण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारने भारत स्वच्छ अभियान राबवून स्वीकारलं आहे. या आव्हानाचा पायाच जणू सुरेश बुरकुल आणि संगिता ओव्हाळे यांनी रचला आहे. त्याचबरोबर प्रचलित व्यवस्थेला छेद देण्याचेही धाडस त्यांनी दाखवले आहे. त्यांच्या या धडसाचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. 

No comments:

Post a Comment