Sunday, April 19, 2015

फँड्रीचा दगड आणि 'कोर्ट'ची थोबडीत...

काल ठरवून 'कोर्ट' पाहिला. असंही चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाला नसता तरी माझ्या उत्सुकतेमध्ये काहीच फरक पडणार नव्हता. चित्रपट पाहिल्यावर मला जो अनुभव आला, तोच अनुभव माझ्या बऱ्याच मित्रांना आलाय. फेसबुकवर तशा प्रतिक्रियाही उमटल्यात. पैसे फुकट गेले! डिरेक्टरने कॅमेरा ऑन ठेवून जे जे घडतय ते फ्रेममध्ये पकडलयं, याला कुणी दिला नॅशनल अॅवॉर्ड... अशा काही कमेंट्स आम्हाला थेटरात ऐकायला मिळाल्या... असो
मला मात्र चित्रपट फारच आवडला. फँड्रीत जब्याने भिरकावलेला तो शवेटचा दगड आणि कोर्टमधल्या त्या न्यायाधिशाने मुक्या मुलाला दिलेली थोबडीत... या दोन्ही सिनमध्ये साम्य दिसतय. एकाने विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेवर दगड भिरकावला होता. दुसऱ्याने 'झोपलेल्या' ज्युडिशिअरीचीच मारलीये. बऱ्याच लोकांना कोर्टचा शेवटचा सिन समजला नाही. जजसाहेब आदल्यादिवशी ज्या मुक्या मुलाबद्दल काळजी वाहत असतात. त्याच्या नावात बदल करून कसले कसले खडे वापरायला सांगतात. दुसऱ्या दिवशी एक मुलांचा घोळका कानाजवळ बोंबलून जजसाहेबांची झोप मोड करतो. जजसाहेब त्या मुक्या मुलाच्या कानाखाली पेटवतात. आपली झोपलेल्या न्यायव्यवस्थेचे तर हे प्रतिक नव्हते ना...



आधी शिवाजी अंडरग्राऊंड आणि आता कोर्ट... संभाजी भगतांनी कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा कायम ठेवलाय.  'दुष्मनाला जान रे' आणि 'म्हणू नका आम्हा कलाकार' ही दोन्ही गाणी कोर्टमध्ये मस्त जमून आलीयेत. एक सिन मध्ये नारायण कांबळेचा वकील पबमध्ये जातो. तेव्हा तिथली गायिका ब्राझिलियन स्ट्रिट साँग मोठ्या अभिमानाने गात असते. आपल्याकडे मात्र स्ट्रिट साँग किंवा जलस्याच्या माध्यमातून गाणाऱ्या कलाकारांना तुरूंगात डांबले जाते. ही विसगंती मोठ्या कलात्कतेने कोर्टमध्ये दाखवली गेलीये.

एकूनच करमनुकीचे पारंपारिक ठोकताळे बांधून जे लोक कोर्ट पाहायला गेले, त्यांचा भ्रमनिरास नक्कीच होणार होता. पण त्याने काही फरक पडत नाही. आपल्या व्यवस्थेच्या चुकांबद्दल कलेच्या माध्यमातून भाष्य केले जात असेल तर त्याचे स्वागतच आहे. 'प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असा डायलॉग राजकारणी सोयीस्करपणे वापरत असतात. पण त्या न्यायालयाची परिस्थिती कशी आहे ? यावर कुणीतरी बोलायला हवे होते. कोर्टने ही भूमिका पार पाडलीये. दिग्दर्शक चैतन्य ताम्हणेने हे वास्तव टोकदारपणे मांडलय. लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याला त्याबद्दल कडक सलामच द्यायला हवा.
कोर्टच्या निमित्ताने एका संकुचित कोषातून परिवर्तनवादी चळवळीची घुसमट बाहेर पडतेय हे काय कमी आहे.

.........

थोडं अवांतर -

चित्रपट पाहताना माझा आणि आमच्या संवाद ग्रुपचा भुतकाळ राहून राहून आठवत होता. कोर्टमधल्या नारायण कांबळे सारखे आम्हीही जलस्याचे कार्यक्रम घ्यायचो. मोकळ्या जागी, ट्रेनमध्ये, चौकात-नाक्यावर पथनाट्य, क्रांतीगीतांचे कार्यक्रम करायचो. अर्थात गाणी असायची प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातलीच... 'जळतोय मराठवाडा' हे गाणं तर कितीतरी वेळा व्हायचं. त्याच काळात खैरलांजी प्रकरण गाजत होतं. नक्षलवादाचा ठपका ठेवलेले चळवळीतले बरेच लोकं आत गेले होते. पण तरी आमचे कार्यक्रम कधी थांबले नव्हते. महिन्यातून एकदातरी ट्रेन कॅम्पेन (ट्रेनमध्ये गाणी आणि वगनाट्य संवादाच्या स्वरुपात जनजागृती) करायचो. त्यावेळी गाणी आणि पथनाट्यामुळे बरीच वादावादीही व्हायची.



मात्र चौकशी किंवा कारवाईच्या फेऱ्यात त्यावेळी तरी आम्ही अडकलो नाही. बरेच जोशात होतो त्यावेळी. पण नारायण कांबळेची जी परिस्थिती दाखवली गेली ती अंगावर काटा आणणारी आहे. वास्तवात कित्येक कार्यकर्ते असे उगाच सडले असतील. जणू काही व्यवस्थेच्या विरोधात उठूच नका. असा संदेश त्यांना द्यायचा असतो.

https://www.youtube.com/watch?v=L0QfvGWeeVQ - Dushmanaala Jaan Re


https://www.youtube.com/watch?v=2IsaW-yRyrw - manu naka amhala kalakar

1 comment:

  1. किशोर..खुप सुंदर मांडणी केली आहेस.. जुन्या आठवणी देखील जाग्या झाल्या..

    ReplyDelete